पॅरालिम्पिक सुवर्णपदक अणि पद्मश्री पुरस्कार विजेते सुभेदार मुरलीकांत पेटकर यांना एनजीएफ चा मानाचा जीवनगौरव पुरस्कार

135

– आभाळ भेदण्याचे सामर्थ्य असलेल्या दिव्यांगांच्या अफाट कर्तृत्वाची ओळख करून देणाऱ्या एनजीएफच्या ८ – व्या राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कारांचे दिमाखात वितरण संपन्न
The गडविश्व
मनोरंजन / मुंबई, ९ ऑक्टोबर : अनेक दिव्यांगांच्या संघर्ष कथा ऐकताना समजले कि त्यांना शिक्षणासाठी अफाट संघर्ष करावा लागला, शाळेत त्रास दिला गेला, टिंगल टवाळी करून हिणवलं, चिडवलं गेलं, वेड ठरवून दगड भिरकावले गेले आणि तो – ती दिव्यांग व्यक्ती चिडली कि त्यावर हसायचे. आपल्या अश्या संस्कृतीचा आपण अभिमान बाळगायचा का ? असा थेट सवाल मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशनच्या ८ व्या राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार’ सोहळ्यात केला. विलेपार्ले येथील टिळक मंदिरातील सभागृहात ते बोलत होते.
शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांकरिता त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’ (एनजीएफ) या मुंबईतील प्रख्यात संस्थेचा ८- वा राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार – २०२३ सोहळा शनिवारी पु.ल. देशपांडे सभागृह, टिळक मंदिर, विले पार्ले (पूर्व ), मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या खास सोहळ्यासाठी ‘मॅगसेसे’ पारितोषिक विजेते पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉ. मंदाकिनी ताई आमटे, तसेच देशासाठी युद्धभूमीवर अलौकिक शौर्य गाजविणारे शौर्यचक्र विजेते कमांडो मधुसुधन सुर्वे, एनकेजीएसबी बँक अध्यक्षा हिमांगी नाडकर्णी, एनजीएफच्या संस्थापिका – अध्यक्षा सौ नूतन विनायक गुळगुळे या मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत यंदाचा ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’चा ८ वा राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार-२०२३’ सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला पार्लेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.
पुढे बोलताना डॉ. प्रकाश आमटे म्हणाले “कि इतक्या भीषण परिस्थितीत आपल्या क्षमतेचा वापर करून प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात उतुंग असं कार्य केलं आहे, देशासाठी कार्य करण्याऱ्या या सर्व दिव्यांगांचे कौतुक करावं तेव्हढे कमीच आहे. मला डॉ. संजय दुधाट यांच्यामुळे या सोहळ्यास येता आले आणि सर्व पुरस्कार्थींच्या पराक्रमाची ओळख करून घेता आली, त्यांना उत्तरोत्तर असेच यश मिळो यासोबतच एनजीएफ संस्थेच्या कार्याचा विस्तार अधिक जोमाने होवो असे ते म्हणाले. तर मंदाताई म्हणाल्या या आज मला एकप्रकारचा कॉम्पलेक्स आलाय, आपल्यासारखे सर्वसामान्य जे करू शकणार नाहीत ते या दिव्यांगांनी करून दाखविले आहे. हे पाहून मला असं वाटतंय कि आपल्यात काहीच नाही आणि उगाच आपलं कौतुक होतंय, त्यांच्यातील हे सर्व गुण पाहून माझं मन भरून आले आहे असे मंदाताई म्हणाल्या तर देशासाठी युद्धभूमीवर अलौकिक शौर्य गाजविणारे शौर्यचक्र विजेते कमांडो मधुसुधन सुर्वे म्हणाले विठठल रखुमाई अर्थात डॉ. प्रकाश आणि मंदाताई यांच्या उपस्थिती मला दिव्यांग बांधवांचा हा सोहळा पाहण्याची संधी विनायक आणि नूतनताईंनी दिली याबद्दल मी त्यांचा विशेष आभारी आहे. देशासाठी कर्तृत्व गाजविणाऱ्या माझ्या शूर दिव्यांगांचा मला विशेष अभिमान आहे. तर एनजीएफ अध्यक्षा नूतन गुळगुळे म्हणाल्या दिव्यांगांप्रती प्रशासनासोबतच नागरिकांनीही सजग होण्याची आवश्यकता असून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आणि भूमिका महत्वाची आहे.
दिव्यांगांचे मनोबळ वाढविण्याचा हेतू ठेऊन ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’ आयोजित केलेल्या या सोहळ्यात अलौकिक आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुश्री गीता चौहान(मुंबई), कु. सिद्धी देसाई(ठाणे), वसंत संखे(मुंबई), सुश्री सिंथिया बाप्टिस्टा(पालघर),रत्नाकर शेजवळ(नाशिक),पांडुरंग भोर(सिन्नर), प्रतिक मोहिते(रायगड), मास्टर रुपांजन सेन(कलकत्ता), कु. अन्वी झांझारुकिया(सुरत), धीरज साठविलकर(रत्नागिरी), श्रीमती नीलिमा शेळके, कु.मनाली शेळके – माता व मूल(पुणे), प्रबोधिनी ट्रस्ट, नाशिक (संस्था), पदश्री मुरलीकांत पेटकर, सांगली (लाईफ टाईम अचिमेंट), श्रीमती स्वप्ना राऊत, मुंबई (कॅन्सर सर्व्हायव्हर) दिव्यांगांना पुरस्कार देऊन गौरव केला. शारीरिक, मानसिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या परंतु अद्वितीय कर्तृत्व सिद्ध करत आपल्या कौशल्यांचा उत्तम वापर करून आपल्या जीवनात अलौकिक कार्य सिद्ध केलेले व्यक्तींचा गुणगौरव करणारा हा भावुक करणारा होता. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. नीता माळी यांनी अमोघ शैलीत केले तर डॉ. संजय दुधाट यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here