– चार तालुक्यांत दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान; जिल्ह्यात तयारी पूर्ण
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या, शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यात १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी झाली असून, मतदानासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा आणि अहेरी या चार तालुक्यांत दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान होणार असल्याने मतदारांनी वेळेचे नियोजन करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये ९ हजार ३१० पुरुष आणि ४ हजार २९८ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले असून, पोलीस बंदोबस्तात मतदान पथके आपापल्या केंद्रांकडे रवाना झाली आहेत.
चार तालुक्यांत दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान
भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित अधिसूचनेनुसार, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा आणि अहेरी या चार तालुक्यांतील मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ अशी आहे. त्यामुळे या तालुक्यांतील मतदारांनी दुपारी ३ वाजण्यापूर्वी मतदान करावे.
गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, धानोरा, मुलचेरा आणि कोरची या उर्वरित आठ तालुक्यांत सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक मतदार
जिल्ह्यात गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ४१६ मतदार असून, येथे सहा मतदान केंद्रे आहेत. चामोर्शी तालुक्यात आष्टीसह चार केंद्रांवर २ हजार १२५, देसाईगंजमध्ये तीन केंद्रांवर १ हजार ८३९, आरमोरीमध्ये तीन केंद्रांवर १ हजार ७५६, कुरखेड्यात दोन केंद्रांवर १ हजार २८८, तर अहेरीमध्ये दोन केंद्रांवर १ हजार १२० मतदारांची नोंदणी आहे.
धानोरा येथे ४७८, मुलचेरा येथे ४१४, एटापल्ली येथे ३५४, सिरोंचा येथे ३२७, कोरची येथे २९२ आणि भामरागड येथे १९९ मतदार आहेत. या तालुक्यांत प्रत्येकी एक मतदान केंद्र आहे.
सहा जिल्ह्यांत ३८ उमेदवार रिंगणात
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. संपूर्ण विभागात ४४५ मतदान केंद्रे असून, २ लाख ५५ हजार ६०३ मतदार नोंदणीकृत आहेत. या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार रिंगणात आहेत.
मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी विभागात २ हजार ५३५ शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच केंद्र सरकारचे ४७६ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. नोंदणीकृत पदवीधर मतदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा, तर खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी चार तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
२७ ऑक्टोबरला मतमोजणी
या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण केली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत पदवीधर मतदारांनी उद्या मतदानात सहभागी व्हावे. विशेषतः एटापल्ली, भामरागड, सिरोंचा आणि अहेरी तालुक्यांतील मतदारांनी दुपारी ३ वाजेपर्यंतची मतदानाची वेळ लक्षात घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #Gadchiroli #GadchiroliNews #GraduateElection #GraduateConstituency #NagpurGraduateConstituency #MaharashtraElection #VotingTomorrow #GraduateVoters #VidhanParishad #ElectionNews #MaharashtraNews #GadchiroliUpdates #TheGadvishva #TheGadvishvaNews
new zealand national cricket team vs india national cricket team timeline
new zealand national cricket team vs india national cricket team match scorecard













