विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आश्रमशाळांतील शिक्षकांची दुपार व रात्रपाळी अनिवार्य; अपर आयुक्तांचे निर्देश

17

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आश्रमशाळांतील शिक्षकांची दुपार व रात्रपाळी अनिवार्य; अपर आयुक्तांचे निर्देश
– उपस्थितीचे फोटोही पाठवावे लागणार
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २१ : आदिवासी आश्रमशाळांमधील निवासी विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शैक्षणिक प्रगती सुनिश्चित करण्यासाठी शिक्षकांची दुपारपाळी व रात्रपाळी अनिवार्य करण्यात आली आहे. यासंदर्भात आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील अपर आयुक्तांनी संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. शिक्षकांच्या उपस्थितीची नियमित नोंद ठेवण्यासह उपस्थितीची छायाचित्रे व्हॉट्सॲपद्वारे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे, त्यांच्या दैनंदिन गरजांकडे लक्ष देणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे, हा या निर्देशांचा मुख्य उद्देश आहे. यासंदर्भात १० सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे.
आश्रमशाळा संहिता २०१९ नुसार मुख्याध्यापकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. आश्रमशाळा आणि वसतिगृहाचे कामकाज सुरळीत चालविण्यासोबतच निवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, सर्वांगीण विकासाची आणि सुरक्षिततेची जबाबदारी मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका आणि शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त तासिका घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सुट्टीच्या दिवशीही नियुक्त्या

अनुदानित आश्रमशाळांमध्ये दररोज तसेच शाळेच्या सुट्टीच्या आणि सणासुदीच्या दिवशीही विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षकांच्या दुपारपाळी व रात्रपाळीच्या नियुक्त्या कराव्या लागणार आहेत. नियुक्त शिक्षकांनी संबंधित वेळेत शाळेच्या परिसरात उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. तसेच आवश्यकतेनुसार रात्रीच्या वेळी अतिरिक्त तासिका घ्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.

उपस्थितीची नोंद आणि छायाचित्रे अनिवार्य

शिक्षकांच्या दुपारपाळी व रात्रपाळीसाठी साप्ताहिक किंवा मासिक वेळापत्रक तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. नियुक्त्यांची नोंद नियमित हजेरी नोंदवहीत घ्यावी, तर रात्रपाळीसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवून उपस्थित कर्मचाऱ्यांची नोंद करावी. संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची छायाचित्रे व्हॉट्सॲपद्वारे प्रकल्प अधिकारी आणि मुख्याध्यापकांना सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्वपरवानगी आवश्यक

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडण्यापूर्वी मुख्याध्यापकांची लेखी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अनुदानित आश्रमशाळांना आवश्यक सूचना द्याव्यात आणि नियमित देखरेख ठेवावी, असे अपर आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या उपाययोजनांमुळे निवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित होण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांची जबाबदारी निश्चित होण्यास मदत होणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #ashramschool

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here