गडचिरोलीच्या लोकमान्य गणेश मंडळाला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार

6

गडचिरोलीच्या लोकमान्य गणेश मंडळाला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार
– रामायणावरील देखाव्याची दखल, ५० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राने गौरव
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या ‘महागणेशोत्सव : महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ उपक्रमांतर्गत आयोजित ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’मध्ये गडचिरोली येथील लोकमान्य गणेश मंडळाने जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पटकावला आहे. मंडळाने यंदा सादर केलेल्या रामायणावरील देखाव्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या यशामुळे गडचिरोलीच्या सांस्कृतिक क्षेत्रात मंडळाचा गौरव झाला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित पारितोषिक वितरण समारंभात लोकमान्य गणेश मंडळाचे आकाश खोब्रागडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला.
मंडळाने रामायणावर आधारित देखाव्याच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले होते. या देखाव्याला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याने मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांचीही बाजी

या स्पर्धेत एकूण ३५४ गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर हाँगकाँग येथील महाराष्ट्र मंडळाने प्रथम, जपानमधील एडोगावा इंडिया कल्चर सेंटरने द्वितीय, तर हेसन इंडियन लेडीज असोसिएशन अँड पायोनियर इंडियन्स ई.व्ही.ने तृतीय क्रमांक मिळविला.
राष्ट्रीय स्तरावर उत्तराखंड येथील महाराष्ट्र समाज सेवा समितीने प्रथम, कर्नाटकातील श्री राम युवक मंडळाने द्वितीय, तर गुजरातमधील गणराया गणेश उत्सव मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. राज्यस्तरावर सांगलीच्या मोरया गणेश मंडळाने प्रथम, नांदेडच्या छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळाने द्वितीय, तर देवनांद्रा येथील स्वराज्य गणेश मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे साडेसात लाख, पाच लाख आणि अडीच लाख रुपये रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचा विस्तार जिल्हा आणि तालुकास्तरापर्यंत करण्यात आला असून, या स्तरांवरील विजेत्या मंडळांचीही घोषणा करण्यात आली आहे.

राजन पाटकर ‘वेलिंग-खातू गणेशमूर्तीकार’ पुरस्काराचे पहिले मानकरी

राज्य शासनाने यंदा प्रथमच जाहीर केलेल्या ‘वेलिंग-खातू गणेशमूर्तीकार’ पुरस्कारासाठी मूर्तिकार राजन विष्णू पाटकर यांची निवड झाली आहे. त्यांना सन्मानचिन्ह, शाल आणि अडीच लाख रुपये रोख देऊन गौरविण्यात येणार आहे.
पाटकर हे पारंपरिक कौटुंबिक मूर्तिकलेचा वारसा जपणारे मूर्तिकार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध ‘गिरगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तिनिर्मितीशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. तसेच वडाळा येथील जी.एस.बी. सेवा मंडळाच्या महाकाय गणेशमूर्तीची निर्मिती ते गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ करीत आहेत. पारंपरिक कलेसोबतच पर्यावरणपूरक मूर्तिनिर्मितीलाही त्यांनी प्राधान्य दिले असून, त्यांच्या पेपर मेशीपासून तयार केलेल्या हलक्या वजनाच्या मूर्ती मुंबईसह लंडनपर्यंत पाठविल्या जातात.
या स्पर्धेतील विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे. #thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #LokmanyaGaneshUtsavMandal #FirstPrize #DistrictLevelAward #MaharashtraState #GaneshUtsav2026 #BestPublicGaneshMandals #MahaGaneshotsav #RamayanaTheme #GaneshFestival #MaharashtraCulture #TheGadvishva #GadchiroliNews #MaharashtraNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here