धानोरा : मॉडेल स्कूलमध्ये शिक्षक द्या, अन्यथा शाळा बंद करा
– पालकांचा पंचायत समितीवर धडक मोर्चा; निवेदनातून शिक्षक नियुक्तीची मागणी
The गडविश्व
ता.प्र /धानोरा, दि. १५ : तालुक्यातील मोहली येथील मॉडेल स्कूलमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होऊन दीड ते दोन महिने उलटले, तरी गणित आणि विज्ञान विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने पालक व विद्यार्थ्यांनी गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी धानोरा पंचायत समितीवर धडक देत शिक्षक नियुक्तीची मागणी केली. ‘शिक्षक द्या, अन्यथा शाळा बंद करा’ अशी भूमिका घेत पालकांनी निवेदनातून प्रशासनाचे लक्ष वेधले.
गणित आणि विज्ञान हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय आहेत. मात्र, या विषयांचे शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची चिंता पालकांनी व्यक्त केली. शाळेत आवश्यक विषयांसाठी शिक्षकच नसतील, तर विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पालक व विद्यार्थ्यांनी पंचायत समितीत जाऊन आपली मागणी मांडल्यानंतर गटविकास अधिकारी वानखेडे आणि गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी या प्रश्नाची दखल घेतली. त्यानंतर गणित आणि विज्ञान विषयांसाठी तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र, तात्पुरत्या व्यवस्थेऐवजी दोन्ही विषयांसाठी कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













