धानोरा : अवैध सागवान तस्करीप्रकरणी तिघांना अटक
– कारवाफा येथे वनविभागाची धाड; तीन दिवसांची वनकोठडी
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि.१६ : तालुक्यातील कारवाफा येथे अवैध सागवान साठा आढळून आल्याने वनविभागाने कारवाई करत तिघांना अटक केली. या कारवाईत सागवानाचे लठ्ठे, चिरान आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून, न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे चातगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या पथकाने हरिदास आनंदराव मडावी यांच्या कारवाफा येथील शेतात धाड टाकली. यावेळी सागवानाचे लठ्ठे, चिरान, आरा, सांगड, कानस तसेच लपवून ठेवलेले सागवान वनोपज आणि आरा रस्सी आढळून आली. वनविभागाने हा मुद्देमाल जप्त केला.
चौकशीदरम्यान सागवान आणण्याच्या प्रकरणात सौरभ रमेश मडावी आणि मुकुल रमेश मडावी यांची नावे समोर आली. त्यानंतर वनविभागाने या दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम ३३ (फ), ४१ आणि महाराष्ट्र वननियमावली २०१४ मधील कलम ३३ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. न्यायालयात हजर केले असता तिघांनाही तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे आणि उपवनसंरक्षक आर्या व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांच्या सहकार्याने वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के पुढील तपास करीत आहेत. कारवाईत चातगाव परिसरातील वनपाल व वनरक्षकांनी सहभाग घेतला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #forest #crimenews #forestgadchiroli













