२३ ऑक्टोबरला पदवीधर निवडणूक; कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष सवलत

17

२३ ऑक्टोबरला पदवीधर निवडणूक; कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष सवलत
– खासगी आस्थापनांतील मतदारांना दोन तासांची मुभा; पात्र कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजेची तरतूद
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदार म्हणून नोंदणी असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या नोंदणीकृत मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. तर मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार, पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत मतदार म्हणून नोंदणी असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित नैमित्तिक रजेव्यतिरिक्त विशेष नैमित्तिक रजा देण्याची तरतूद आहे. संबंधित शासन निर्णय मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दरम्यान, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा लागू नसल्याने त्यांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. ही माहिती नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त (सामान्य प्रशासन), नागपूर विभाग यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here