जनतेचा विश्वास जिंका, बूथ मजबूत करा; संघटनाच विजयाची गुरुकिल्ली : आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम
– गडचिरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या कार्याचे कौतुक
The गडविश्व
गडचिरोली, दि.१३ : राजकारण हे केवळ निवडणुका लढविण्याचे साधन नसून जनसेवेचे प्रभावी माध्यम आहे. कार्यकर्त्यांनी जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिल्यासच जनतेचा विश्वास संपादन करून पक्ष संघटना अधिक बळकट करता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
गडचिरोली येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या भव्य पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या संघटनात्मक कार्याचे विशेष कौतुक करत, जिल्ह्यात पक्षाची मजबूत उभारणी करण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले. आगामी काळातही त्याच जिद्द आणि समर्पणाने पक्षाची धुरा सांभाळावी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर पक्ष संघटना सक्षम करण्याचे आवाहन करताना आ. डॉ. आत्राम म्हणाले, “बूथ बळकट असेल तर विजय निश्चित होतो. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी.”
कार्यकर्त्यांनी आधुनिक विचारसरणी स्वीकारून सोशल मीडियासह प्रत्यक्ष जनसंपर्कावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच राजकारणातील यश-अपयश हा प्रवासाचा भाग असून, पराभवाने खचून न जाता अधिक जोमाने काम करण्याची वृत्तीच खऱ्या कार्यकर्त्याची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. टीका आणि अफवांकडे दुर्लक्ष करून विकासकामांच्या बळावरच विरोधकांना उत्तर द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्याला जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, युवक व महिला कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. डॉ. आत्राम यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.













