गडचिरोलीला स्वतंत्र डाक विभागाचा दर्जा ; १५ जुलैपासून नवी व्यवस्था लागू
– चंद्रपूर विभागातून प्रशासकीय विभाजन, १५ जुलैला टपाल, बँकिंग व विमा सेवा बंद, १६ पासून नियमित व्यवहार सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : गडचिरोली जिल्ह्याच्या प्रशासकीय विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत भारतीय डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोलीचा स्वतंत्र डाक विभाग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. नव्या प्रशासकीय रचनेनुसार १५ जुलै २०२६ पासून गडचिरोली विभाग स्वतंत्रपणे कार्यरत होणार असून, जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालये आता स्वतंत्र विभागीय प्रमुखांच्या नियंत्रणाखाली कामकाज करणार आहेत.
या निर्णयामुळे डाक विभागाची प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण, टपाल सेवा, बचत बँक, टपाल जीवन विमा तसेच डिजिटल सेवांचा अधिक प्रभावी लाभ उपलब्ध होणार आहे. यापूर्वी प्रशासकीय कामांसाठी चंद्रपूर विभागावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, स्वतंत्र विभाग अस्तित्वात आल्यानंतर अनेक सेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.
दरम्यान, नवीन व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या पार्श्वभूमीवर १५ जुलै रोजी गडचिरोली विभागातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये टपाल, बचत बँक, टपाल जीवन विमा आणि इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. त्यानंतर १६ जुलैपासून सर्व सेवा नियमितपणे सुरू करण्यात येणार असल्याचे डाक विभागाने स्पष्ट केले आहे.
डाक विभागाच्या माहितीनुसार, प्रशासकीय पुनर्रचनेनंतर दैनंदिन टपाल वितरणासह बचत बँक, विमा आणि इतर ग्राहकाभिमुख सेवा अधिक सक्षम, जलद व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील.
अधिक माहितीसाठी नागरिकांनी ०७१७२-२५५३३७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच sspcdp.mah@gmail.com किंवा spgde.mah@gmail.com या ई-मेलद्वारेही संपर्क साधता येईल, अशी माहिती वरिष्ठ डाक अधीक्षक एस. रामा कृष्णा यांनी दिली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #IndiaPost #PostalDepartment #PostalServices #NewPostalDivision #AdministrativeReforms #PublicService #IndiaPostOffice #DigitalServices #PostalBanking #PostalLifeInsurance #Maharashtra #GadchiroliNews #BreakingNews #TheGadVishwa













