लोकशाहीच्या रक्षणासाठी गडचिरोली-चंद्रपूरचे शेकडो काँग्रेस कार्यकर्ते जाणार दिल्लीला

2

लोकशाहीच्या रक्षणासाठी गडचिरोली-चंद्रपूरचे शेकडो काँग्रेस कार्यकर्ते जाणार दिल्लीला
– ‘व्होट बचाव, देश बचाव’ आंदोलनाच्या नियोजनासाठी गडचिरोलीत बैठक; महेंद्र ब्राह्मणवाडे यांची उपस्थिती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : काँग्रेसच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित ‘व्होट बचाव, देश बचाव – चलो दिल्ली’ आंदोलनात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या नियोजनासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बैठक घेण्यात आली. यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. मतदारांच्या मतदानाच्या अधिकारांचे संरक्षण, निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात आवाज उठविणे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी हे आंदोलनाचे प्रमुख मुद्दे असल्याचे सांगण्यात आले.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मताला महत्त्व असून, मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांबाबत जबाबदारी निश्चित करून लोकशाहीवरील जनतेचा विश्वास कायम राखला पाहिजे, असे मत महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या लढ्याला पाठबळ देण्यासाठी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीतील आंदोलनात सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत आंदोलनाची रूपरेषा, तालुकास्तरावर जनजागृती, कार्यकर्त्यांचा सहभाग आणि दिल्लीला जाण्यासाठी आवश्यक नियोजन यावर चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here