जमीन नावावर करण्यासाठी ५ हजारांची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात

8

जमीन नावावर करण्यासाठी ५ हजारांची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात
The गडविश्व
नांदेड, दि. २३ : जिल्ह्यातील भोकर येथे पत्नीच्या नावावरील शेतजमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. साहेबराव हैबती टोमके असे संबंधित तलाठ्याचे नाव असून, ते नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील चिदगिरी सज्जात ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे चिदगिरी येथील गट क्रमांक २९० मध्ये ८० आर शेतजमीन आहे. पत्नीचे निधन झाल्यानंतर ही जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी तक्रारदाराने २१ ऑक्टोबर रोजी भोकर येथील तलाठी कार्यालयात टोमके यांची भेट घेतली. यावेळी वारसदारांचे ५०० रुपयांच्या बाँड पेपरवर संमतीपत्र घेण्यास सांगून जमीन नावावर करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली.
तक्रारीनंतर एसीबीने २२ ऑक्टोबर रोजी लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी तडजोडीनंतर ५ हजार रुपये तत्काळ आणि उर्वरित ७ हजार रुपये दोन दिवसांनंतर स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भोकर येथील तलाठी कार्यालयात तक्रारदाराकडून ५ हजार रुपये स्वीकारताना टोमके यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.
या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक प्रिती जाधव यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #nandednews #acbmaharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here