हजारो ‘सीडबॉल’मधून हिरव्या भविष्याची पेरणी; कुरखेडा वनविभागाचा स्तुत्य उपक्रम

8

हजारो ‘सीडबॉल’मधून हिरव्या भविष्याची पेरणी; कुरखेडा वनविभागाचा स्तुत्य उपक्रम
– शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, देशी वृक्षसंवर्धनासाठी वनकर्मचाऱ्यांची अनोखी मोहीम
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. १४ : वाढते शहरीकरण आणि मानवी हस्तक्षेपामुळे घटत चाललेल्या वनसंपदेच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी कुरखेडा वनपरिक्षेत्राने नावीन्यपूर्ण पुढाकार घेतला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. गोपुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्षेत्र कुरखेडाच्या वतीने हजारो देशी प्रजातींचे ‘सीडबॉल’ तयार करून त्यांचे जंगल परिसरात बीजारोपण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात शाळकरी विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग असून, पर्यावरणाबाबत जनजागृतीसह प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात आला आहे.
मे महिन्यात वनकर्मचारी आणि रोजंदारी कामगारांनी माती, शेणखत व रेती यांचे योग्य मिश्रण करून सीडबॉल तयार केले. या गोळ्यांमध्ये जांभूळ, बेल, कडुनिंब, शिवण, आवळा, बांबू आणि बेहडा यांसारख्या स्थानिक व उपयुक्त वृक्षांच्या बियांचा समावेश करण्यात आला. उन्हात वाळवून हे सीडबॉल पावसाळ्यात वापरण्यासाठी तयार करण्यात आले.
उपक्रमाचा विस्तार करत कुरखेडा उपक्षेत्राच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर हायस्कूल (वडेगाव), श्रीराम हायस्कूल व महाविद्यालय (कुरखेडा), आंचिव हायस्कूल आणि स्व. हरबाजी सोनकुसरे हायस्कूल (तळेगाव) येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. क्षेत्र सहाय्यक एस. एल. कंकलवार यांनी विद्यार्थ्यांना सीडबॉल तयार करण्याची प्रात्यक्षिके देत त्यांचा पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला, पडिक जमिनीवर आणि डोंगराळ भागात वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन केले.
सध्या पावसाळ्याची सुरुवात झाल्याने वनकर्मचारी जंगलातील दैनंदिन गस्तीदरम्यान रिकाम्या व उघड्या जागांवर हे सीडबॉल टाकत आहेत. दुर्गम भागातही नैसर्गिक पद्धतीने वृक्षलागवड होण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे वनविभागाने सांगितले.
या मोहिमेला वनरक्षक पी. ए. निसार, एस. एन. वालदे, आर. एस. मुडमदिगेला, ए. एम. आतला यांच्यासह विकी गोबाडे, नरेश तांदुळकर, विवेक गहाणे, सुरेश मडावी, प्रमोद डोंगरवार आणि वाकडी रोपवाटिकेतील सर्व रोजंदारी कामगारांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी नागेश फाये, विजय लोथे, सुधीर ठवरे आणि आंचिव हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी नागरिकांना आवाहन करत, “वनसंवर्धन ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने सीडबॉल उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनात हातभार लावावा,” असे सांगितले.
पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कुरखेडा तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कौतुक होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here