कारवाफा येथे महामार्गालगत मृत्यूचा सापळा ; धोकादायक झाड हटवण्यास प्रशासनाची टाळाटाळ
– ७ दिवसांनंतरही कारवाई नाही; ‘लेखी अर्ज करा’ म्हणत वन विभागाकडून दिरंगाई, नागरिकांत संताप
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १४ : कारवाफा येथील राष्ट्रीय महामार्गालगत एक मोठे झाड अर्धवट वाकलेल्या अवस्थेत धोकादायकरीत्या उभे असून ते कधीही रस्त्यावर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मार्गावर दिवसरात्र वाहनांची मोठी वर्दळ असल्याने झाड कोसळल्यास गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या धोकादायक झाडाबाबत ग्रामस्थांनी तत्काळ कारवाईची मागणी करत ग्रामपंचायत व वन विभागाचे लक्ष वेधले आहे. ग्रामपंचायतीला माहिती देऊन चार दिवस उलटले असून, वन विभागाशी संपर्क साधून सात दिवस झाले तरी झाड हटविण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलट, “लेखी अर्ज करा” असे सांगून प्रक्रियेत वेळ घालवला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
विशेष म्हणजे हे झाड कोणत्याही खासगी जागेत नसून थेट राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी आहे. सध्या या परिसरात रस्ता व नाली बांधकाम सुरू असल्याने झाडाची पकड आणखी कमकुवत झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक झाड हटवावे, अशी मागणी कारवाफा ग्रामस्थांनी केली आहे.













