गडचिरोली : १४ वर्षांपासून रखडलेल्या नाळेवाही पुलाची कागदपत्रेच गायब

3

गडचिरोली : १४ वर्षांपासून रखडलेल्या नाळेवाही पुलाची कागदपत्रेच गायब
– माहितीच्या अधिकारातून धक्कादायक खुलासा, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १४ : आरमोरी तालुक्यातील जांभळी ते धानोरा तालुक्यातील रांगी मार्गावरील नाळेवाही नाल्यावर उभारण्यात येत असलेल्या अपूर्ण पुलासंदर्भातील कोणतीही अधिकृत कागदपत्रे संबंधित कार्यालयात उपलब्ध नसल्याचा धक्कादायक खुलासा माहितीच्या अधिकारातून झाला आहे. तब्बल १४ वर्षांपासून रखडलेल्या या पुलासाठी किती निधी मंजूर झाला, किती खर्च करण्यात आला आणि काम नेमके का थांबले, याची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याने या प्रकरणावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे.
आरमोरी तालुक्याच्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील जांभळी गावाजवळील नाळेवाही नाल्यावर जांभळी–रांगी मार्गासाठी सुमारे १४ वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. कामाच्या सुरुवातीला खोदकाम करून पुलाचे खांब उभारण्यात आले; मात्र स्लॅब टाकण्यापूर्वीच बांधकाम थांबले आणि ते आजतागायत पुन्हा सुरू झालेले नाही.
स्थानिकांच्या माहितीनुसार, बांधकामाला नक्षलवाद्यांनी विरोध केल्यामुळे काम रखडले. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराची नक्षलवाद्यांकडून हत्या झाल्यानंतर हे काम पूर्णपणे बंद पडल्याचे गावकरी सांगतात.
या प्रकरणी जांभळी ग्रामपंचायतीच्या सरपंच अनंती मनिराम पदा यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय, गडचिरोली येथे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज दाखल करून पुलासंदर्भातील माहिती मागविली होती. त्यावर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे जनमाहिती अधिकारी तथा सहायक अभियंता (श्रेणी-१) यांनी दिलेल्या उत्तरात संबंधित पुलाबाबत कार्यालयात कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
उत्तरानुसार, संबंधित माहितीचा शोध घेण्यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला. तसेच कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तपासणीही करण्यात आली. मात्र, संबंधित रस्ता व पुलासंदर्भातील कोणतीही नोंद, दस्तऐवज अथवा ऑनलाइन माहिती उपलब्ध नसल्याचे निष्पन्न झाले. शिवाय, त्या काळातील उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता निवृत्त झाल्यामुळेही माहिती मिळू शकली नसल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये अनेक दशकांपूर्वीची कागदपत्रेही जतन केली जातात आणि बहुतांश नोंदी आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत अवघ्या १४ वर्षांपूर्वीच्या पुलाचे संपूर्ण रेकॉर्ड गायब होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.

पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटतो

नाळेवाही नाल्यावरील अपूर्ण पुलामुळे जांभळी, दवडी आणि परिसरातील गावांतील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. नाला भरून वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटतो. शेतकऱ्यांना शेतात जाणे, विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे आणि रुग्णांना उपचारासाठी बाहेर नेणे अत्यंत कठीण होते. जीव धोक्यात घालून नाला ओलांडण्याची वेळ नागरिकांवर येते.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, २०२२ मध्ये आलेल्या पुरामुळे सुमारे १०० नागरिक नाल्याच्या दोन्ही बाजूंना अडकून पडले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी दोरखंड आणि स्थानिक साधनांच्या मदतीने त्यांची सुटका केली होती. अशा घटना वारंवार घडूनही पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
दरम्यान, अपूर्ण पुलाची कागदपत्रे गहाळ होण्यामागील कारणांचा शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि रखडलेले पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जांभळी ग्रामपंचायतीच्या सरपंच अनंती पदा यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here