रेती वाहतुकीने पेंढरी–पेकीनमुडझा मार्गाची चाळण ; विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जीव धोक्यात

26

रेती वाहतुकीने पेंढरी–पेकीनमुडझा मार्गाची चाळण ; विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जीव धोक्यात
– रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची तहसीलदारांकडे ग्रामस्थांची मागणी
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १३ : धानोरा तालुक्यातील पेकीनमुडझा–पेंढरी मार्गावर सुरू असलेल्या रेती वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, पेंढरी ते पेकीनमुडझा मार्गावरील सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील एका शेतात साठवून ठेवलेल्या रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. या मार्गावरून जड वाहनांची सातत्याने ये-जा होत असल्याने पेकीनमुडझा, मोहगाव आणि पेंढरी या गावांना जोडणारा प्रमुख रस्ता पूर्णपणे उखडला असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक, प्रवासी, शासकीय कर्मचारी तसेच शाळा-महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक बनल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
रेती उत्खनन व वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या या रस्त्याची कोणतीही डागडुजी करण्यात आलेली नसल्याने संबंधित कंत्राटदारांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासनाने रेती उत्खनन व वाहतुकीची चौकशी करून त्यावर नियंत्रण ठेवावे, खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी (गडचिरोली) तसेच पेंढरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनाही देण्यात आल्या असून प्रशासनाने त्वरित कारवाई करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here