मका उत्पादकांना दिलासा कधी? ‘आप’ची हमीभाव खरेदी केंद्रासाठी ठाम मागणी
– कुरखेड्यातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, तातडीने केंद्र सुरू करण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २३ : गडचिरोली जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड झाली असून उत्पादन चांगले आले तरी योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांसोबतच मका खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे आणि हमीभावाने (MSP) खरेदी करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने कुरखेडाचे तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नसीर हाशमी, जिल्हा सचिव अमृत मेहेर, जिल्हा संघटक ताहीर शेख, कोषाध्यक्ष इरफान पठाण यांच्यासह शेतकरी मनोहर झोडे, योगराज नाकाडे, सचिन झोडे, सोपान इस्कापे, मनोज परशुरामकर, माधव दहीकर, ज्ञानेश्वर गहाणे आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कुरखेडा तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मका पिकाचे क्षेत्र लक्षणीय वाढले आहे. साठवणुकीची सोय नसल्याने एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मका बाजारात येत असल्याने दर घसरत आहेत. शेतकऱ्यांना कमी दरात विक्री करावी लागत असून आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करून हमीभावाने खरेदी सुरू करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष नसीर हाशमी यांनी सांगितले की, “शेतकरी हा जिल्ह्याचा कणा आहे. मका पिकासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली जाते, पण योग्य भाव न मिळाल्यास त्यांचे नुकसान होते. प्रशासनाने लवकरात लवकर मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आम्ही यासाठी सातत्याने पाठपुरावा करू.”
तहसीलदार राहुल पाटील यांनी निवेदन स्वीकारत संबंधित विभागाकडे मागणी पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शेतकरी वर्ग या मागणीची प्रतीक्षा करत असून, केंद्र सुरू न झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आम आदमी पार्टीने शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मोहीम तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.













