गडचिरोली : दुचाकीच्या पेट्रोल टाकी अन् सीटमधून दारूची तस्करी

15

गडचिरोली : दुचाकीच्या पेट्रोल टाकी अन् सीटमधून दारूची तस्करी
– दोन दुचाकींसह २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी करण्यासाठी दुचाकींच्या पेट्रोल टाकी आणि सीटचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गडचिरोली पोलिसांनी वैनगंगा नदीजवळ नाकाबंदी दरम्यान कारवाई करत दोन दुचाकींसह २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई १८ ऑक्टोबर रोजी गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीजवळ करण्यात आली. गडचिरोली पोलीस ठाण्याचे पथक नाकाबंदी करीत असताना दुचाकीवरून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित दुचाकींना थांबवून तपासणी केली.
यावेळी तानाजी नानाजी पेंदोरकर (वय ३२) आणि सौरभ प्रकाश महाजनवार (वय १९), दोघेही रा. व्याहाड (बु.), ता. सावली, जि. चंद्रपूर, यांच्या दुचाकींची झडती घेण्यात आली. दोन्ही वाहनांच्या पेट्रोल टाकी आणि सीटच्या आतील भागात देशी दारूच्या ९० मिली क्षमतेच्या प्रत्येकी २०० निप लपवून ठेवल्याचे आढळले. अशा एकूण ४०० निपची किंमत ३२ हजार रुपये आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन दुचाकींची अंदाजित किंमत २ लाख रुपये असून, पोलिसांनी एकूण २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी सीमावर्ती भागात २४ तास नाकाबंदी राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिली.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. आणि प्रभारी सहायक पोलीस अधीक्षक सुयश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचिरोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here