गडचिरोली : ‘तो पुन्हा आला’, वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार

2

गडचिरोली : ‘तो पुन्हा आला’, वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार
– परिसरात वाघाच्या हल्ल्यांची मालिका सुरूच
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : जंगलालगतच्या शेतात धान कापण्यासाठी गेलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील जारावंडीनजीकच्या इरपनपायली येथे मंगळवारी (ता. २०) सकाळी उघडकीस आली. बिलाशी आनंद बा असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे जारावंडी परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिलाशी बा या सोमवारी (ता. १९) जंगलालगतच्या शेतात धान कापण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, संध्याकाळ होऊनही त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. मंगळवारी सकाळी शेतापासून काही अंतरावरील जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली येथे पाठविण्यात आला. बिलाशी बा यांच्या पश्चात पती, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.

यापूर्वीही शेतकऱ्याचा घेतला होता बळी

जारावंडी परिसरात वाघाच्या हल्ल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी १७ ऑगस्ट रोजी जारावंडीनजीकच्या दोलंदा येथील हरी वड्डे या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जारावंडी आणि पेंढरी येथे चक्काजाम आंदोलन करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
मात्र, त्यानंतरही वाघाचा धोका कायम असल्याने नागरिकांमध्ये वनविभागाविरोधात नाराजी वाढत आहे. शेतीच्या कामासाठी जंगलालगतच्या शेतांमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाघाच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना करून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchiroliforest #tigerattack #atapalli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here