चिमण्यांच्या रक्षणासाठी लॉयड्स मेटल्सचा पुढाकार; ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ निमित्त विद्यार्थ्यांत पर्यावरण जागर
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे ‘जागतिक चिमणी दिन’ निमित्त हेडरी येथील लॉयड्स राज विद्यानिकेतन शाळेत आयोजित जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिमण्यांचे पर्यावरणीय महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू ठरला.
सुरजागड आयर्न आणि खाण प्रकल्पाच्या पर्यावरण विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत संवादात्मक सत्र घेण्यात आले. यामध्ये चिमण्यांची कीटक नियंत्रण, बियांचे प्रसारण तसेच पर्यावरणाच्या आरोग्याचे निदर्शक म्हणून असलेली भूमिका सविस्तरपणे उलगडण्यात आली.
यावेळी चिमण्यांची घटती संख्या ही शहरीकरण, अधिवासाचा ऱ्हास, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीशी निगडीत उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांसमोर वास्तवदर्शी चित्र मांडण्यात आले.
दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. पक्ष्यांसाठी पाणी व दाण्याची व्यवस्था करणे, घरटी बसविण्यासाठी बॉक्स तयार करणे तसेच नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे यांसारखे सोपे उपाय अंगीकारण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होऊन जैवविविधता संवर्धनासाठी सकारात्मक पावले उचलण्याची प्रेरणा मिळाल्याचे दिसून आले.













