कुनघाडा रै बसथांबा ठरतोय ‘अपघातांचे हॉटस्पॉट’; लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
– अपघातांची मालिका कायम, स्थानिकांचा संताप
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : गडचिरोली–चामोर्शी मुख्य मार्गावरील कुनघाडा रै बसथांबा परिसर पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला असून, लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे हा परिसर ‘अपघातांचे हॉटस्पॉट’ ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीजी ०४ एमक्यू ९५७४ क्रमांकाचा लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक गडचिरोलीवरून चामोर्शीकडे जात होता. त्याचवेळी एमएच ३३ यू ६००४ क्रमांकाची सुझुकी दुचाकी घेऊन नितीन उद्धव खोब्रागडे (वय ४५) हे कुनघाडा रै येथून गडचिरोलीकडे निघाले होते. बसथांबा परिसरात पोहोचताच, दुचाकीस्वार नियमानुसार डाव्या बाजूने जात असतानाच भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत खोब्रागडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते गंभीर अवस्थेत आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या फिरत्या पोलिस पथकाने तत्काळ त्यांना चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे रेफर करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक मुकेशकुमार सिंधो ठाकुर (वय 42) रा. एकडा पोस्ट. बांसजोरा ता. लोयाबाद जि. धनबाद (झारखंड राज्य) घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
दरम्यान, कुनघाडा रै बसथांबा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. जानेवारी महिन्यातील एका अपघातात अतुल तुळशीराम कोसमशिल्ले यांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी २ जानेवारी रोजी चक्काजाम आंदोलन छेडले होते. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या धोकादायक ठिकाणी तातडीने बॅरिकेड्स उभारणे, वेगमर्यादा नियंत्रणासाठी उपाययोजना करणे तसेच कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त तैनात करणे अत्यावश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. अपघातांची वाढती मालिका पाहता, प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













