रांगीत ‘छत्रपती महाराजस्व अभियान’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ९९६ प्रमाणपत्रांचे वितरण

82

रांगीत ‘छत्रपती महाराजस्व अभियान’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ९९६ प्रमाणपत्रांचे वितरण
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २३ : धानोरा तालुक्यातील रांगी येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आदर्श नाट्यकला मंडळाच्या रंगमंचावर पार पडलेल्या या शिबिरात विविध योजनांअंतर्गत एकूण ९९६ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या शिबिरात रांगी महसूल मंडळातील सुमारे २५ गावांतील नागरिकांनी सहभाग नोंदविला. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात पट्टे वाटप, राशनकार्ड निर्मिती, वारस फेरफार (१०१), सातबारा दुरुस्ती (०८), डिजिटल सातबारा (३७२), नमुना ८-अ (१८०) तसेच इतर प्रमाणपत्रे (२९७) व ‘एक खिडकी योजना’ अंतर्गत ३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
शिबिरादरम्यान डोमिसाईल, जात प्रमाणपत्र, वारस फेरफार यांसह शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली. विविध विभागांच्या स्टॉल्समुळे नागरिकांना तत्काळ मार्गदर्शन व सेवा मिळाली. हे समाधान शिबिर वर्षातून चार वेळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोलीचे अध्यक्ष शशिकांत साळवे होते. तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. मंचावर नंदा आंबेकर (कृषी उपअधीक्षक, भूमी अभिलेख), सरोगडे (तालुका कृषी अधिकारी), ठाकरे (कृषी अधिकारी, पंचायत समिती), चेतन सुरपाम (उपसरपंच, निमनवाडा) यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी वैशाली डोंगरे यांनी केले. नितीन कावळे यांनी संचालन केले, तर मकरंद बांबोळे यांनी आभार मानले. शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी रांगी मंडळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here