श्रीरामनवमी–हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत १५ दिवस जमावबंदी लागू
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : आगामी श्रीरामनवमी (२६ मार्च) व हनुमान जयंती (२ एप्रिल) उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तसेच नक्षल चळवळीच्या टी.सी.ओ.सी. कालावधीत संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवसांची जमावबंदी लागू केली आहे.
जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. सदर आदेश दि. २२ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ००.०१ वाजल्यापासून लागू झाला असून तो दि. ५ एप्रिल २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावी राहणार आहे.
या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस शस्त्रे, स्फोटक पदार्थ तसेच दगडफेकसाठी वापरले जाणारे साहित्य बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता मिरवणुका, सभा, आंदोलन यांवरही बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.














