फुले-आंबेडकर कॉलेजमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात
– निबंध स्पर्धा व सामूहिक वाचनातून ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३ : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोलीद्वारे संचालित फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रूपेंद्रकुमार गौर होते, तर डॉ. किशोर बी. कुडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. गौर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकीरा’ या कादंबरीचा संदर्भ देत त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. डॉ. कुडे यांनी अण्णाभाऊंच्या अथक संघर्षातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच ग्रंथालय विभागात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर आधारित सामूहिक वाचन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय व ग्रंथालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपक तायडे यांनी केले, तर डॉ. हितेश चरडे यांनी आभार मानले.













