सुपीक शेतजमिनींच्या अधिग्रहणाला विरोध ; ६ खासदारांसह गडचिरोलीतील शेतकऱ्यांची उपराष्ट्रपतींकडे धाव

6

सुपीक शेतजमिनींच्या अधिग्रहणाला विरोध ; ६ खासदारांसह गडचिरोलीतील शेतकऱ्यांची उपराष्ट्रपतींकडे धाव
The गडविश्व
नवी दिल्ली, दि. ०३ : गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनविण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप करीत, जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय अथवा औद्योगिक प्रकल्पासाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करू नयेत, अशी ठाम मागणी गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली. महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाने ६ खासदारांसह नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपतींची भेट घेऊन निवेदन सादर केले.
शेती हे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असून, मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहित झाल्यास हजारो शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे. जमिनी गेल्यास अनेक शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट व उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर–गुरुवळा परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांमध्ये आणि जयरामपूर परिसरातील १३ गावांमध्ये प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पांसाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणालाही शेतकऱ्यांचा विरोध आहे.
जिल्ह्यातील एमआयडीसी, विमानतळ अथवा अन्य कोणत्याही प्रकल्पासाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करू नयेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी निवेदने, आंदोलने, मोर्चे तसेच मुंडन आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन जमीन अधिग्रहणाचे आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.
उपराष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात शिष्टमंडळाने गडचिरोली जिल्हा पेसा क्षेत्रात येत असल्याचे नमूद केले. पेसा कायद्यानुसार ग्रामसभांना विशेष अधिकार असतानाही ग्रामसभांचा स्पष्ट विरोध डावलून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, वर्षा गायकवाड, श्यामकुमार बर्वे, प्रशांत पडोळे, गोवाल पाडवी आणि सलंग ए. सदमा उपस्थित होते.
महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मनोहर पा. पोरेटी, ॲड. दुष्यंत नामदेव कीरसान, दिवाकर निसार, प्रमोद भगत, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, वसंत राऊत, राजेश ठाकूर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, धिवरू मेश्राम, विकास जेंगठे, मारुती कांबळे, रवी बोदलकर, निकेश तुंकलवार, साईनाथ चलाख, सुनील कोहपरे, भक्तदास भगत, मनोज दहेलकर, गुरुदास ठुसे, वसंत बुर्णवार, तात्याजी चिचघरे, गुरुदास ठाकरे, विजय निकुरे, विजय लाड, नदीम नाथानी, विपुल एलटीवार यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here