तलावात बुडून युवकाचा मृत्यू ; कुरखेडा तालुक्यात दोन दिवसांत दुसरी दुर्घटना
– खेडेगावातील तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे दुःख ताजे असतानाच धानोरीत आणखी एक बळी
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. २ : खेडेगाव येथील सती नदीत बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ताजी असतानाच कुरखेडा तालुक्यात पुन्हा एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. तालुक्यातील धानोरी येथील पंकज दिलीप वाटगुरे (वय अंदाजे २२) या युवकाचा गावाशेजारील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २) सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे धानोरी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज वाटगुरे हे व्यवसायाने ऑटोचालक होते. ऑटो चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. रविवारी दिवसभर घरच्या रोवणीचे काम आटोपल्यानंतर ते आंघोळीसाठी गावाशेजारील तलावात गेले. तलावात उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे.
काही वेळानंतर ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच तलाठी चेतन मडावी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाला पाचारण करण्यात आले असून, स्थानिक मासेमारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. वृत्त लिहिपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
विशेष म्हणजे, शनिवारी (दि. १) खेडेगाव येथील सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेचे दुःख ताजे असतानाच अवघ्या सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील धानोरी येथे आणखी एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण कुरखेडा तालुका हादरला आहे.
पंकज वाटगुरे हे कुटुंबातील प्रमुख कमावते सदस्य होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, धानोरी गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन दिवसांत बुडण्याच्या घटनांमध्ये चार जणांचा बळी गेल्याने नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #Kurkheda #Dhanori #Gadchiroli #DrowningIncident #TragicDeath #YouthDeath #PondDrowning #MaharashtraNews #LocalNews #TheGadVishva #GadchiroliNews #BreakingNews













