भगवानपूर–वाढोणा परिसरात हत्तींचा धुमाकूळ ; पिकांचे मोठे नुकसान
– माजी आमदार कृष्णाजी गजबे यांची नुकसानग्रस्त शेतीला भेट, तातडीने पंचनामा व भरपाईची मागणी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०२ : तालुक्यातील भगवानपूर–वाढोणा परिसरात हत्तींच्या धुमाकुळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी तातडीने परिसराला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये आणि परिसरातील शेतकऱ्यांनी हत्तींकडून होत असलेल्या पिकांच्या नुकसानीची माहिती गजबे यांना दिली होती. त्यानंतर त्यांनी संबंधित गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेतली.
पाहणीनंतर गजबे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याच्या सूचना दिल्या. वन विभाग आणि प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे तसेच बाधित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
भगवानपूर–वाढोणा परिसरातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून, त्यांची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. मात्र, दरवर्षी हत्तींच्या कळपाकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आणि योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली.
यासंदर्भात प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कृष्णाजी गजबे यांनी दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, माजी सरपंच चंद्रकांत चौके, सेवाभाऊ सहारे, नारनावरे, रामकृष्ण कावळे, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













