कुरखेडा : अखेर तलावात बुडालेल्या युवकाचा २४ तासांनंतर शोध,धानोरी गावावर शोककळा

16

कुरखेडा : अखेर तलावात बुडालेल्या युवकाचा २४ तासांनंतर शोध,धानोरी गावावर शोककळा
– एनडीआरएफ व स्थानिक मच्छीमारांच्या अथक प्रयत्नांना यश, चिखलात रुतलेला मृतदेह जाळ्यात अडकला
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०३ : तालुक्यातील धानोरी येथील गाव तलावात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेला अखेर तब्बल २४ तासांनंतर सोमवारी दुपारी यश आले. एनडीआरएफच्या पथकाने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने दुपारी सुमारे २.३० वाजता युवकाचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. या हृदयद्रावक घटनेमुळे धानोरी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत युवकाचे नाव पंकज दिलीप वाटगुरे असे आहे. रविवारी रोवणीचे काम आटोपल्यानंतर पंकज गावातील तलावात आंघोळीसाठी गेला होता. मात्र, तलावातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने शोधकार्य सुरू केले, परंतु अंधार आणि तलावातील पाण्याची खोली यामुळे त्याचा शोध लागला नाही.
यानंतर प्रशासनाने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. रविवारी रात्री सुमारे ८.३० ते ११ वाजेपर्यंत पथकाने तलावात शोधमोहीम राबविली, मात्र अंधारामुळे मृतदेह सापडू शकला नाही. सोमवारी सकाळी पुन्हा मोटारबोटीच्या सहाय्याने एनडीआरएफचे पथक आणि स्थानिक मच्छीमारांनी संयुक्तपणे शोधकार्य सुरू केले.
सुमारे आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तलावातील चिखलात रुतलेला पंकजचा मृतदेह मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने मृतदेह तलावाबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे पाठविला.
शोधमोहीमेदरम्यान नायब तहसीलदार वैभव आंबेकर, कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र वाघ, पुराडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र मैहस्कर तसेच महसूल व पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या दुर्दैवी घटनेमुळे वाटगुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, धानोरी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
#thegdv #thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #dhamori #breakingnews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here