नशामुक्त भारतासाठी सशक्त तरुणाईची गरज : प्राचार्य डॉ. हरिश्चंद्र कामडी

21

नशामुक्त भारतासाठी सशक्त तरुणाईची गरज : प्राचार्य डॉ. हरिश्चंद्र कामडी
– मालेवाडा महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत जनजागृती कार्यक्रम
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा दि. ०४ : येथील ॲड. विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. व्यसनमुक्त आणि सुदृढ समाजनिर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिश्चंद्र कामडी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. एम. कामडी होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. दिलीप नंदेश्वर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, तर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. हिवराज राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू तसेच इतर अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणामांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. कामडी म्हणाले, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित समस्या नसून ती संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीत अडथळा निर्माण करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून शिक्षण, आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्याला प्राधान्य द्यावे. नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी युवकांनी जनजागृतीची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. दिलीप नंदेश्वर यांनी ‘नशामुक्त भारत अभियान’ची उद्दिष्टे स्पष्ट करत युवकांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेचे प्रमाण, त्याचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम आणि व्यसनांपासून दूर राहण्याच्या उपायांबाबत मार्गदर्शन केले. व्यसनांना ठाम नकार देणे, सकारात्मक मित्रपरिवाराची निवड करणे, खेळ आणि वाचनाची आवड जोपासणे तसेच मानसिक तणावाच्या काळात पालक व शिक्षकांशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतः व्यसनमुक्त राहण्यासह कुटुंब व समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांनी नशामुक्तीविषयक घोषवाक्यांच्या माध्यमातून जनजागृती केली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रमोद कुमरे यांनी केले, तर आभार प्रा. भगत डी. नूरुटी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here