गडचिरोली : कुमनार जंगलात पुरलेला माओवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त, १४ अग्निशस्त्रांसह स्फोटक साहित्य हस्तगत
– नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस व सीआरपीएफची संयुक्त कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी घातपाती कारवायांसाठी जंगलात जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) संयुक्त कारवाईत जप्त केला. महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगल परिसरात राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत एकूण १४ अग्निशस्त्रे, आयईडी स्फोटकासह इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या बंगाडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली असून, उर्वरित माओवादी सुरक्षा दलांवर हल्ले व घातपाती कारवाया करण्यासाठी दुर्गम आणि आंतरराज्यीय सीमावर्ती जंगल परिसराचा वापर करीत असल्याची माहिती आहे. माओवादी विविध प्रकारची अग्निशस्त्रे व स्फोटक साहित्य तयार करून ते गोपनीय पद्धतीने जंगलातील जमिनीत लपवून ठेवत होते. नक्षल सप्ताह, निवडणुका तसेच अन्य महत्त्वाच्या काळात या साहित्याचा वापर करून सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगल परिसरात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली होती. त्यानुसार ३१ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाच्या प्राणहिता येथील चार तुकड्या, बॉम्ब शोध व नाशक पथक (बीडीडीएस) आणि सीआरपीएफच्या जवानांना शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले.
१ ऑगस्ट रोजी विशेष अभियान पथकांनी कुमनार जंगल परिसराला घेराव घालून सखोल शोधमोहीम राबविली. बीडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आढळून आला.
या कारवाईत एक एसएलआर रायफल, एक .३०३ रायफल, सात १२ बोअर रायफल, तीन सिंगल शॉट रायफल आणि दोन बीजीएल लॉन्चर्स, अशी एकूण १४ अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली. तसेच तीन एसएलआर मॅगझिन, एक आयईडी स्फोटक आणि दोन बॅटऱ्यांसह इतर माओवादी साहित्यही हस्तगत करण्यात आले. घटनास्थळावरील सर्व साहित्य सुरक्षितरीत्या जप्त करण्यात आले आहे.
यापूर्वी २३ मे, २७ मे आणि २७ जून २०२६ रोजीही माओवाद्यांविरोधात प्रभावी कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे माओवाद्यांच्या घातपाती कारवायांच्या तयारीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली पार पडली.
विशेष अभियान पथक, इंटेलिजन्स सेल, बीडीडीएस पथक आणि सीआरपीएफच्या जवानांनी ही कारवाई यशस्वी केली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी मोहिमेत सहभागी सर्व जवानांचे कौतुक केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews













