अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला – रांगी परिसरातील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

56

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला – रांगी परिसरातील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
– नुकसानभरपाईची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०४ : धानोरा तालुक्यातील रांगी, मोहली, जांगदा, चिंगली, महावाडा, कनाडगाव, निमणवाडा व निमगाव बोरी परिसरातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे मोठे संकट कोसळले आहे. परतीच्या पावसामुळे कापणी केलेल्या आणि उभ्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची अनेक महिन्यांची मेहनत अक्षरशः पाण्यात गेली आहे.
तालुक्यात 23 आणि 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेले मध्यम प्रतीचे धान पाण्याने भिजून सडले असून काही ठिकाणी धान्याला अंकुर फुटले आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच कर्जाच्या विळख्यात सापडलेले शेतकरी निसर्गाच्या या पुन्हा कोसळलेल्या आघाताने पूर्णपणे खचले आहेत.
सिंचनाच्या सुविधेविना शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने मध्यम कालावधीच्या धानाची लागवड केली होती. मात्र सलग पाच-सहा दिवसांच्या जोरदार पावसामुळे शेतात साठवलेले कडपे भिजून गेले असून काही ठिकाणी पाण्याखाली गेले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्त क्षेत्रांचे तात्काळ सर्वेक्षण करून पंचनामे करण्याची आणि योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. निसर्गाच्या कोपामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरीत मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here