– दारुबंदी जिल्ह्यात अवैध दारूनिर्मितीवर पोलिसांची धडक कारवाई , आरोपी फरार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात बनावट देशी दारू तयार करून विक्री करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एकूण 10 लाख 16 हजार 375 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ, सिलींग मशीन, वाहने तसेच शेकडो लिटर स्पिरीटचा साठा पोलिसांच्या ताब्यात आला असून आरोपी व्यंकटेश बैरवार (रा. मुरुमगाव, ता. धानोरा) हा फरार आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील दारुबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेला 3 नोव्हेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की व्यंकटेश बैरवार हा आपल्या घरात बनावट देशी दारू तयार करून ती टाटा सुपर ए.सी.ई. (MH-34 AV-2051) वाहनातून विक्रीसाठी वाहतूक करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुरुमगाव बाजार मंडी परिसरात सापळा रचला. तेथे संशयास्पद वाहन उभे असल्याचे दिसून आले. पंचासमक्ष तपासणी केली असता वाहनाच्या चोरकप्यात देशी व विदेशी दारूचा मोठा साठा आढळला. त्यानंतर जवळच उभ्या अशोक लेलँड (दोस्त MH-33 T-2035) वाहनाची तपासणी केली असता, दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे स्पिरीटचे दोन ड्रम, सुमारे 500 किलो रासायनिक द्रव्य, जप्त करण्यात आले.
यानंतर आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली असता बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन सिलींग मशीन, प्लास्टिक पाईप, झाकण, खाकी रंगाचे खरडे व इतर साहित्य पोलिसांना मिळून आले. एकूण जप्त मुद्देमालात दोन सिलींग मशीन (किंमत 20 हजार रुपये), दोन ड्रममध्ये 500 किलो स्पिरीट (किंमत 1 लाख 52 हजार रुपये), अशोक लेलँड दोस्त वाहन (किंमत 3 लाख रुपये), टाटा सुपर ए.सी.ई. वाहन (किंमत 4 लाख रुपये), तसेच गोवा व्हिस्की आणि रॉकेट संत्रा ब्रँडच्या देशी व विदेशी दारूचा साठा (किंमत 1 लाख 42 हजार रुपये) असा एकूण 10 लाख 16 हजार 375 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी पोस्टे मुरुमगाव येथे भान्यसंहितेचे कलम 123, 318(4) तसेच मद्यनिषेध कायद्याचे कलम 65(ड), 65(ब), 65(ई), 65(फ), 65(ए), 65(सी) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. भगतसिंग दुलत, पोना. धनंजय चौधरी, पोअं. राजु पंचफुलीवार आणि मपोशि. वृषाली चव्हाण यांच्या पथकाने पार पाडली.
आरोपी व्यंकटेश बैरवार सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे दारुबंदी जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती आणि पुरवठा साखळीवर पोलिसांनी प्रभावी आळा बसवला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews













