सिकलसेलमुक्त गडचिरोलीचा संकल्प : ‘अरुणोदय’ मोहिमेचा भव्य जिल्हास्तरीय शुभारंभ

108

सिकलसेलमुक्त गडचिरोलीचा संकल्प : ‘अरुणोदय’ मोहिमेचा भव्य जिल्हास्तरीय शुभारंभ
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : जिल्ह्यात सिकलसेल ॲनिमिया या अनुवांशिक आजाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहिमेचा भव्य जिल्हास्तरीय शुभारंभ आज(१५) जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उत्साहात पार पडला. लोकसहभाग, व्यापक तपासणी आणि प्रभावी जनजागृतीच्या माध्यमातून ‘सिकलसेलमुक्त गडचिरोली’चा संकल्प या मोहिमेद्वारे घेण्यात आला.
या मोहिमेचे उद्घाटन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर, अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, तसेच नगरसेवक शेखर आखाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांची उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सिकलसेल हा केवळ वैद्यकीय नव्हे तर सामाजिक प्रश्न असल्याचे नमूद केले. “लोकसहभाग, नियमित तपासणी आणि समाजप्रबोधनाच्या जोरावरच सिकलसेलमुक्त गडचिरोली साकार होऊ शकते,” असे सांगत त्यांनी नागरिकांना तपासणीस पुढे येण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी मोहिमेची व्याप्ती गावपातळीपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले. दुर्गम व अतिदुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत सिकलसेल स्क्रीनिंग पोहोचवून वेळीच निदान व उपचार देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी समाजात व्यापक जनजागृतीची आवश्यकता व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी पथनाट्य, जनसंवाद व प्रबोधनपर उपक्रमांच्या माध्यमातून सिकलसेल निर्मूलन शक्य असल्याचे सांगितले. आरोग्य यंत्रणा सर्व विभागांच्या सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी हायड्रॉक्सी युरिया उपचारांच्या प्रभावी वापरामुळे सिकलसेलमुळे होणाऱ्या गंभीर गुंतागुंतीत घट होत असल्याची माहिती दिली.

पथनाट्यातून प्रभावी जनजागृती

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेली दोन प्रभावी पथनाट्ये. सिकलसेल आजाराची लक्षणे, विवाहापूर्व तपासणीचे महत्त्व, “कुंडलीपेक्षा सिकलसेल रिपोर्ट पाहा” हा समाजोपयोगी संदेश आणि आजारावर मात करण्यासाठी आवश्यक काळजी यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थिनींच्या या कलाविष्काराचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमास जिल्हा महिला रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनिष मेश्राम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, फिजिशियन डॉ. इंद्रजीत नागदेवते, डॉ. प्रशांत पेंदाम, डॉ. प्रफुल गोरे यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिकलसेल नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे यांनी केले. त्यांनी ‘अरुणोदय’ मोहिमेची उद्दिष्टे व उपलब्ध आरोग्य सुविधा यांची माहिती दिली. आभार प्रदर्शन जिल्हा सिकलसेल समन्वयक कु. रचना फुलझेले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी, सूत्रसंचालन करणाऱ्या श्रीमती रुचिता सयाम व प्रिया चाचेरे, प्राचार्य परिचर्या प्रशिक्षण केंद्र गडचिरोलीच्या श्रीमती मेघा कुळसंगे, नर्सिंग स्कूलची चमू, साई नर्सिंग स्कूलचे प्राचार्य, सिकलसेल समुपदेशक नीता बालपांडे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here