भावी पिढी सुदृढ होण्यासाठी सिकलसेल जनजागृती प्रभावी करा : जयंत हरडे
– उपजिल्हा रुग्णालयात सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियानाचा शुभारंभ
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १५ : सिकलसेल हा अनुवांशिक आजार असून आई-वडील दोघेही वाहक किंवा आजारग्रस्त असतील तर अपत्याला सिकलसेल होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सिकलसेल बाधित अपत्य जन्माला येऊ नये यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. दोन वाहक किंवा पीडित व्यक्तींमध्ये विवाह होऊ नये, याबाबत आरोग्य विभागाने अंतिम घटकांपर्यंत पोहोचत प्रभावी अभियान राबवावे, असे आवाहन रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जयंत पाटील हरडे यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील २१ जिल्ह्यांत सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ आज कूरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. जयंत पाटील हरडे यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार राहुल पाटील, रुग्ण कल्याण समिती सदस्य सिराज पठाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ए. व्ही. गहाणे, महसूल सहाय्यक चेतन मडावी यांची उपस्थिती होती.
यावेळी सिकलसेल ग्रस्त रुग्णांना सिकलसेल हेल्थ कार्ड वितरित करण्यात आले. या कार्डामध्ये रुग्णाची वैद्यकीय माहिती व उपचारांचा सविस्तर तपशील नमूद आहे. कार्यक्रमानंतर आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले.
मार्गदर्शन करताना डॉ. अमित ठमके व डॉ. गहाणे यांनी अभियानादरम्यान राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांबाबत तसेच उपचार व शासकीय योजनांची माहिती देत अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए. व्ही. गहाणे यांनी केले. संचालन डॉ. जगदीश बोरकर यांनी केले, तर आभार अधिपरिचारिका पुष्पलता खवड यांनी मानले.













