चिखली येथे भक्तिमय वातावरणात श्री शिवपुराण कथा संपन्न
The गडविश्व
ता.प्र /कुरखेड, दि. १४ : तालुक्यातील चिखली येथे आयोजित करण्यात आलेली श्री शिवपुराण कथा मोठ्या भक्तिमय आणि धार्मिक सलोख्याच्या वातावरणात संपन्न झाली. या धार्मिक सोहळ्यात भागवताचार्य पंडित अविनाशजी दुबे महाराज यांनी आपल्या ओजस्वी वाणीमधून भगवान शिवांच्या महिम्याचे प्रभावी आणि रसाळ विवेचन करून उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केले.
कथेदरम्यान महाराजांनी शिवभक्तीचे महत्व, धर्माचरणाची गरज तसेच समाजात सद्भावना आणि ऐक्य टिकविण्याचा संदेश दिला. शिवपुराणातील विविध प्रसंगांचे उदाहरण देत त्यांनी अध्यात्मिक जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला चिखली तसेच परिसरातील अनेक गावांमधून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथा श्रवणाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हनुमान मंदिर समितीचे विष्णुदास डाहाळे, डॉ. गुलाब पगडवार, विजय डाहाळे, महेश बसोना, विनोद डाहाळे, रमेश मच्छीरके, हरिष बहेटवार, वासुदेव बहेटवार, सचिन मोहारे, लोकेश पोटावी, हिरामण मोमदेकर, नंदलाल दाऊददसरे, रुपेश रक्षे, योदेश मच्छीरके, मुकेश लिल्हरे तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
कथेदरम्यान भजन-संगीताची सुरेल साथ यादव चौधरी यांच्या संचाने दिली. कार्यक्रमास माजी आमदार कृष्णा गजबे, भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, नवनाथ धाबेकर, संजय मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंडित अविनाशजी दुबे महाराज यांचा सत्कार करण्यात आला.













