कलेच्या माध्यमातूनही जीवनाचे ध्येय साध्य करता येते : पद्मश्री डॉ. परशुराम खूणे

106

कलेच्या माध्यमातूनही जीवनाचे ध्येय साध्य करता येते : पद्मश्री डॉ. परशुराम खूणे
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १४ : कला ही केवळ आनंद आणि मनोरंजनाचे साधन नसून अंगी असलेल्या कलागुणांची जोपासना केल्यास त्या माध्यमातून उपजीविकेचे साधन निर्माण होऊन जीवनाचे ध्येय साध्य करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या कलेला व्यवसायाचे स्वरूप देत तिचा विकास करावा, असे आवाहन पद्मश्री डॉ. परशुराम खूणे यांनी केले.
स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सवाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून शहर विचार मंचाचे संयोजक माधवदास निरंकारी, उपप्राचार्य पी. एस. खोपे, उपप्राचार्य डॉ. अभय साळुंखे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संजय महाजन, विद्यार्थी प्रतिनिधी राकेश उईके व सांस्कृतिक विभाग प्रमुख वैभव दखणे उपस्थित होते.
यावेळी सन २०२४–२५ या शैक्षणिक सत्रात विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणारे विद्यार्थी, विद्यापीठ व आंतरविद्यापीठ स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. तसेच गांधी विचार संस्कार परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील सांस्कृतिक स्पर्धांमध्ये संगीत, गायन, नृत्य, रांगोळी, पोस्टर प्रदर्शन, आनंद मेला स्पर्धा तसेच राष्ट्रीय सेवा योजनेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच महाविद्यालयाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन डॉ. संजय महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मयुरी सहारे व प्रा. डॉ. रवींद्र विखार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. तृप्ता वाकडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here