पेंढरी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध योजनेचा फज्जा ; अभियान कागदोपत्रीच

91

पेंढरी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध योजनेचा फज्जा ; अभियान कागदोपत्रीच
– प्रत्यक्षात अस्वच्छता व अनागोंदी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २५ : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत राज्यभर विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात येत असताना, धानोरा तालुक्यातील पेंढरी ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरत असल्याचे चित्र आहे. बहुतांश अभियान केवळ कागदोपत्रीच राबविल्याचे दिसून येत असून, प्रत्यक्षात मात्र या योजनेचा फज्जा उडाल्याचा आरोप ग्रामस्थ व जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उद्देश ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून सर्वांगीण, शाश्वत विकास साधणे, गावांना स्वावलंबी, स्वच्छ, हरित व डिजिटल बनविणे तसेच सुशासन प्रस्थापित करणे हा आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून उत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन व पुरस्कार देणे हे या अभियानाचे मूळ उद्दिष्ट आहे.
मात्र पेंढरी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. स्वच्छतेचे दाखले कागदावर दाखविले जात असले, तरी प्रत्यक्षात ग्रामपंचायत व गावांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या आणि सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मुख्य चौकातच कचऱ्याचे ढिगारे साचलेले असून, स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्टपणे जाणवते.हजारो रुपये खर्च करून घंटागाडी खरेदी करण्यात आली असताना, त्यानंतर लाखो रुपयांची इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन गाडी घेण्यात आल्याचेही सांगितले जाते. मात्र ही वाहने वापरण्याऐवजी उभीच ठेवण्यात येत असल्याचा आरोप आहे. स्वच्छतेच्या नावाखाली आलेला मोठा निधी नेमका कोणत्या कामासाठी वापरण्यात येतो, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

अभियानातील साहित्य खरेदीची चौकशीची मागणी

या अभियानांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे, वाचनालय, बंधारे, स्वच्छता व आरोग्यविषयक साहित्य, अंगणवाडी व शाळांचे सुशोभीकरण, नाली उपसा, क्रीडांगण तसेच वाचनालयासाठी पुस्तके आदी विविध साहित्य खरेदी केल्याचे दाखविण्यात आले आहे. लोकसंख्येने मोठी असलेल्या पेंढरी ग्रामपंचायतीला १५व्या वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतो. तसेच व्यापारी दुकानदारांमुळे ग्रामनिधी व विविध कररूपानेही मोठी रक्कम जमा होते.
मात्र या निधीतून खरेदी करण्यात आलेले साहित्य प्रत्यक्षात उपलब्ध आहे की नाही, की केवळ बिलांपुरतेच मर्यादित आहे, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ कार्यालयामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
दरम्यान, याबाबत ग्रामपंचायत अधिकारी छगन खुणे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “सदर कचरा एक महिन्यापूर्वी साफ करण्यात आला होता, मात्र पुन्हा साचल्याने लवकरच साफ केला जाईल. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे हे जेम पोर्टलवरून खरेदी करण्यात आले आहेत.”
मात्र या स्पष्टीकरणाने ग्रामस्थांचे समाधान झाले नसून, प्रत्यक्ष पाहणी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here