जांभूळखेडा परिसरात बिबट्याचा हल्ला, व्यक्ती गंभीर जखमी
– इशाऱ्यांकडे दुर्लक्ष ठरले जीवघेणे
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २५ : तालुक्यातील जांभूळखेडा गावाजवळ बुधवारी (दि. २४) दुपारी बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रामधीन झाडुराम कोराम (रा. जांभूळखेडा) असे जखमीचे नाव असून, वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे त्यांना तात्काळ उपचार मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाने २३ डिसेंबर रोजीच परिसरात बिबट्याच्या हालचालींची पूर्वकल्पना देत नागरिकांना जंगल भागात जाण्यास मनाई केली होती. क्षेत्र सहाय्यक एस. एस. कंकलवार व वनरक्षकांनी रामधीन कोराम यांनाही स्पष्ट इशारा दिला होता. मात्र, २४ डिसेंबर रोजी ते पुन्हा त्या जंगल भागात गेल्याने दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनपरीक्षेत्र अधिकारी एल. एम. गोपुळवाड, क्षेत्र सहाय्यक एस. एल. कंकलवार, एस. डब्ल्यू. गोंनाडे, कु. एस. एन. वालदे, एम. के. दुधबळे तसेच वनमजूर विकी गोबाडे व विवेक गहाणे यांनी जखमी रामधीन कोराम यांना त्वरित कुरखेडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
सध्या रामधीन कोराम यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. घनदाट जंगल परिसरात मानव–वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी वन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे जांभूळखेडा व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभाग बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.














