आजपासून गडचिरोली महोत्सव : तीन दिवसांचा सांस्कृतिक जल्लोष

67

आजपासून गडचिरोली महोत्सव : तीन दिवसांचा सांस्कृतिक जल्लोष
– आदिवासी कला, क्रीडा स्पर्धा आणि नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत उत्सवाला रंग
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : अतिदुर्गम, माओवादग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलातर्फे आयोजित ‘गडचिरोली महोत्सव २०२५’ ची आजपासून सुरुवात होणार आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन, स्थानिक कलागुणांना व्यासपीठ आणि युवकांना क्रीडा स्पर्धांद्वारे प्रेरणा देण्याचा हा उपक्रम तीन दिवस चालणार आहे.
शासकीय कृषी महाविद्यालय, गडचिरोली येथे होणाऱ्या या महोत्सवात आदिवासी समूह नृत्य स्पर्धा, वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा आणि बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा या प्रमुख आकर्षणांचा समावेश असून, दुर्गम व अतिदुर्गम भागातून आलेल्या संघांमध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध बचत गट, संस्था आणि हस्तकलेच्या वस्तूंचे स्टॉल नागरिकांसाठी खुले राहणार आहेत.
दि. २६ व २७ डिसेंबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपूरे, कुशल बद्रिके व हेमांगी कवी, गोंडी गीतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ममता उईके व अर्जुन धोपटे, तसेच निरंजन बोबडे, अभिनेत्री माधुरी पवार व गायक पद्मनाभन गायकवाड यांचा समावेश आहे. स्थानिक कलाकारांनाही या मंचावर संधी देण्यात येणार आहे.
दरम्यान, या महोत्सवाचा समारोप २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉन २०२५ (सिझन-३) ने होणार असून, यामध्ये जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत. २१, १०, ५ व ३ किलोमीटर अशा विविध अंतरांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या असून, विजेत्यांना एकूण ४.१४ लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
या भव्य महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कलाकार व खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here