ग्रामीण पत्रकारितेला नवे बळ; गोंडवाना विद्यापीठाचा रायपूरच्या पत्रकारिता विद्यापीठाशी सामंजस्य करार
– विद्यार्थ्यांना संयुक्त उपक्रम, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : ग्रामीण भागातील पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासह शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता व जनसंचार विद्यापीठ, रायपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे दोन्ही विद्यापीठांमधील विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांना परस्पर सहकार्याच्या माध्यमातून ज्ञान व कौशल्यविकासाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या करारासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. सरफराज अंसारी यांनी रायपूर येथे उपस्थित राहून कराराची प्रक्रिया पूर्ण केली. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या सहकार्याने हा उपक्रम साकार झाला.
करारप्रसंगी कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता व जनसंचार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोज दयाल यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना दोन राज्यांतील पत्रकारिता शिक्षणाचा हा महत्त्वपूर्ण संगम असल्याचे नमूद केले. विशेषतः ग्रामीण पत्रकारिता आणि विकासात्मक संशोधनाला चालना देण्यासाठी या सहकार्याचा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. सरफराज अंसारी यांचा छत्तीसगडच्या पारंपरिक अंगवस्त्राने सन्मान करण्यात आला.
या सामंजस्य करारांतर्गत दोन्ही विद्यापीठांमध्ये संयुक्त शैक्षणिक व संशोधन उपक्रम राबविणे, विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणे, प्राध्यापकांची देवाणघेवाण करणे तसेच अभ्यासक्रम विकासासाठी परस्पर सहकार्य करणे शक्य होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर प्रत्यक्ष माध्यम क्षेत्रातील अनुभव आणि संशोधनाच्या संधीही मिळतील.
यावेळी कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता व जनसंचार विद्यापीठाचे कुलसचिव सुनील कुमार शर्मा, जनसंचार विभागप्रमुख डॉ. राजेंद्र मोहंती, इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागप्रमुख डॉ. नृपेन्द्र शर्मा, व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. आशुतोष मढ़ावी यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते.
या सहकार्यामुळे गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि ग्रामीण भागातील प्रश्न, विकासाचे मुद्दे व स्थानिक पत्रकारितेला शैक्षणिक आणि संशोधनाच्या माध्यमातून अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #GondwanaUniversity #KushabhauThakreUniversity #JournalismEducation #RuralJournalism #MediaEducation #AcademicCollaboration #MoU #ResearchDevelopment #Gadchiroli #Chhattisgarh













