बालकांच्या सुरक्षेसाठी कुरखेड्यात जनजागृती; पोक्सो कायद्याचे धडे

2

बालकांच्या सुरक्षेसाठी कुरखेड्यात जनजागृती; पोक्सो कायद्याचे धडे
– गुड टच-बॅड टच, लैंगिक अत्याचाराविरोधात तक्रार करण्याची प्रक्रिया आणि बालहक्कांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. २९ : बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणे, त्यांना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक करणे आणि अन्यायाविरोधात आवाज उठविण्यास सक्षम बनविणे, या उद्देशाने कुरखेडा येथील विकास विद्यालय तथा थोरवी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवारी (२९ ऑक्टोबर) ‘सुरक्षित बचपन अभियान’ राबविण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्या सूचनेनुसार तालुका विधी सेवा समिती, कुरखेडा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे अध्यक्ष पी. आर. आकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक अलगदेवे आणि रोहित ढवळे उपस्थित होते. तालुका विधी सेवा समितीचे अधिवक्ता अमोल शेंडे यांनी विद्यार्थ्यांना कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना अधिवक्ता अमोल शेंडे यांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायदा २०१२ विषयी सविस्तर माहिती दिली. गुड टच आणि बॅड टच यांतील फरक ओळखणे, अयोग्य स्पर्श किंवा लैंगिक अत्याचाराच्या प्रसंगी कोणती खबरदारी घ्यावी, तसेच अशा घटनांविरोधात तक्रार कुठे आणि कशी करावी, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करता विश्वासू व्यक्ती, पालक किंवा संबंधित यंत्रणेची मदत घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात पी. आर. आकरे यांनी थोर महापुरुषांच्या जीवनातील उदाहरणे देत विद्यार्थ्यांनी चांगले संस्कार आत्मसात करावेत आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवून आदर्श नागरिक बनावे, असे मार्गदर्शन केले.
या अभियानात जिल्हा परिषद केंद्र शाळा, कुरखेडा, ग्रामीण विकास विद्यालय, कुरखेडा आणि विकास विद्यालय, कुरखेडा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे संचालन केंद्र शाळा, कुरखेडाचे मुख्याध्यापक घनश्याम तुलावी यांनी केले, तर सायली मस्के यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नरोटे, गजानन राऊत, रितेश कोडाप, मोहन प्रधान, बोडणे, कावडे, विशाखा काशीकर आणि यादव लांजेवार यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here