हेडरीत आपत्कालीन सिझेरियन यशस्वी; मातेला वेदनारहित प्रसूतीचा अनुभव
– लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयातून सुरक्षित प्रसूती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गर्भावस्थेतील गुंतागुंत आणि बाळाच्या प्रकृतीला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन करण्यात आलेल्या आपत्कालीन सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यानही मातेला वेदना जाणवल्या नाहीत. हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयात (LKAMH) एपिड्युरल भूलतंत्राचा प्रभावी वापर करून ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. या प्रसूतीत महिलेने २.२७७ किलो वजनाच्या निरोगी मुलाला जन्म दिला.
सुरुवातीला नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रयत्न सुरू असताना महिलेला प्रसूतीवेदना कमी करण्यासाठी एपिड्युरल अॅनाल्जेसिया देण्यात आले होते. मात्र, गर्भजलाचे प्रमाण कमी असणे, गर्भाची वाढ अपेक्षेप्रमाणे न होणे आणि बाळाच्या मानेभोवती नाळेचा एक फेरा असणे अशा गुंतागुंती आढळून आल्या. त्यातच गर्भाच्या प्रकृतीवर ताण येत असल्याची लक्षणे दिसल्याने डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
या परिस्थितीत वैद्यकीय पथकाने आधी दिलेल्या एपिड्युरल भूलतंत्राचाच प्रभावीपणे विस्तार करून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक भूल दिली. त्यामुळे जनरल अॅनेस्थेशिया देण्याची आवश्यकता भासली नाही. डॉक्टरांमधील समन्वय आणि अॅनेस्थेशियातील तज्ज्ञतेमुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि मातेला वेदनारहित प्रसूतीचा अनुभव मिळाला.
दुर्गम भागात आधुनिक आरोग्यसेवा
उच्च जोखमीच्या गर्भावस्थेत वेळेवर निर्णय घेणे, योग्य भूलतंत्राचा वापर आणि डॉक्टरांमधील समन्वय किती महत्त्वाचा असतो, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले. माता आणि नवजात बालकाची सुरक्षितता लक्षात घेऊन उपचार करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात कार्यरत असलेले लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालय आदिवासी समाजासह आरोग्यसेवेपासून वंचित नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आधुनिक उपचारांसोबतच रुग्णांना संवेदनशील आणि सन्मानपूर्वक सेवा देण्यावर रुग्णालयाचा भर आहे.
या यशस्वी उपचाराबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी डॉक्टर आणि सहायक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच माता आणि नवजात बालकाच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. दुर्गम भागातील नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.













