धानोरा तालुक्यात वाघाची दहशत कायम; आठ दिवसांत दुसरा बळी
– पेंढरी परिसरात भीतीचे वातावरण
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २८ : धानपिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेलेल्या २६ वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना धानोरा तालुक्यातील तुडमेल (कचकल) परिसरात २७ ऑक्टोबर रोजी समोर आली. संतराम सनू मडावी असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे पेंढरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतराम मडावी हे २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास धानपिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना वनविभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक ३०५ मध्ये घडल्याची माहिती आहे.
आठ दिवसांत दुसरा बळी; पशुधनावरही हल्ले
धानोरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आठ दिवसांपूर्वी इरपनार येथील बिलाशी आनंद या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी याच परिसरात वाघाने एका बैलासह गायीवर हल्ला करून त्यांना ठार केले. आता तुडमेल येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणखी वाढली आहे.
धान कापणीचा हंगाम सुरू असताना पिकांची पाहणी आणि शेतीची कामे करण्यासाठी शेतात जाणेही धोकादायक ठरत आहे. वाघाच्या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
या घटनेप्रकरणी धानोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास गावते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय कोर्डे पुढील कारवाई करीत आहेत.













