गडचिरोली : दिवाळीपूर्वीच धान खरेदीची लगबग, २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू
– जिल्ह्यात ५४ केंद्रांना मंजुरी; आधार कार्ड, सातबारा अन् बँक पासबुक आवश्यक
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : दिवाळीच्या धामधुमीतच खरीप हंगामातील धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २० धान खरेदी केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ५४ केंद्रांना मंजुरी मिळाली असून, धान विक्रीसाठी पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने केले आहे.
पणन हंगाम २०२६–२७ साठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या आदेशानुसार कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा आणि घोट या उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी सध्या २० केंद्रांवर नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.
या केंद्रांवर करता येणार नोंदणी
भाडभिडी, कुरखेडा, गेवर्धा, सोनसरी, शिरपूर, मध्यवर्ती गोदाम आरमोरी, कुरुंडीमाल, उराडी, अंगारा, मध्यवर्ती गोदाम पोटेगाव, मध्यवर्ती गोदाम नवेगाव गडचिरोली, कोरची, कोटगुल, मसेली, पुराडा, मालेवाडा, धानोरा, मुरुमगाव, रांगी आणि कारवाफा या केंद्रांवर शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे.
नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक
शेतकऱ्यांनी संबंधित शासकीय धान खरेदी केंद्रावर स्वतः उपस्थित राहून आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा, आधारसंलग्न मोबाइल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. शासनाच्या ‘BeAM’ पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे.
धान खरेदीचे वेळापत्रक आणि शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराची माहिती संबंधित केंद्रांमार्फत दिली जाणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संभारे यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhankharedi













