गडचिरोली : जमिनीत पुरून ठेवलेला माओवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त, पाच अग्निशस्त्रे हस्तगत

4

गडचिरोली : जमिनीत पुरून ठेवलेला माओवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त, पाच अग्निशस्त्रे हस्तगत
– माचुवंचा जंगलात पोलिसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : जिल्ह्यातील वांगेतुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माचुवंचा जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवलेला माओवाद्यांचा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी मंगळवारी (२७ ऑक्टोबर) जप्त केले. यात पाच अग्निशस्त्रे, १२ क्लेमोर आणि १०० सुतळी बॉम्बसह विविध माओवादी साहित्याचा समावेश आहे.
माचुवंचा जंगल परिसरात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाच्या चार तुकड्या आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) मंगळवारी पहाटे शोधमोहिमेसाठी रवाना झाले.
जंगल परिसरात कसून शोध घेतला असता जमिनीत पुरून ठेवलेला शस्त्रसाठा आढळून आला. यात एक १२ बोअर रायफल, तीन सिंगल शॉट रायफल, एक एअरगन, १२ क्लेमोर, एक बॉटल स्फोटक, एक जिवंत क्लेमोर स्फोटक, एक वायरलेस माईक सेट, हत्याराचा लोअर हँडगार्ड, १०० सुतळी बॉम्ब आणि माओवादी गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या हिरव्या कापडाच्या पाच जोड्या आढळल्या.
पोलिसांनी हा शस्त्रसाठा ताब्यात घेतला. तसेच दोन स्फोटकांसह विविध माओवादी साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकाने पार पाडली. या मोहिमेत सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कौतुक केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here