कोटमी येथे पोलीस दलाच्या आरोग्य शिबिरात ७० नागरिकांची तपासणी

2

कोटमी येथे पोलीस दलाच्या आरोग्य शिबिरात ७० नागरिकांची तपासणी
– मोफत औषधोपचारासह शासकीय योजनांचा लाभ; दुर्गम भागात आरोग्यविषयक जनजागृती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सोमवारी (२६ ऑक्टोबर) कोटमी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ७० नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. तसेच सहा नागरिकांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात जाण्याची शिफारस करण्यात आली.
पोलीस रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात वैद्यकीय पथकाने नागरिकांची तपासणी केली. पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मडावी यांच्या नेतृत्वाखाली औषधनिर्माण अधिकारी प्रकाश दानव आणि अधिपरिचारिका सोनाली कुमरे यांनी सेवा दिली. यावेळी विविध आजार, पोषणविषयक समस्या आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरादरम्यान १३ नागरिकांना एसटी बस स्मार्ट कार्ड काढून देण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देऊन नागरिकांना त्यांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस दलाच्या वतीने लावण्यात आलेल्या फिरत्या प्रदर्शनातून शहीद जवानांचे बलिदान, सी-६० जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती देण्यात आली.

५० हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी

गडचिरोली पोलीस दलाच्या माहितीनुसार, २०२१ पासून आतापर्यंत जिल्ह्यात २२५ आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातून ५० हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सहा रक्तदान शिबिरांतून ४ हजार ८६४ युनिट रक्त संकलित करण्यात आले. तसेच ‘ऑपरेशन रोशनी’अंतर्गत ९ हजार ९७१ हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, १ हजार ४१२ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. आणि हर्षवर्धन बी. जे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. कोटमी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोल्हे, विवेक लोंढे आणि पोलीस अंमलदारांनी शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here