देसाईगंज: शेतात नांगरणी करताना बैल बुजाडले, शेतकऱ्याचा मृत्यू

1

देसाईगंज: शेतात नांगरणी करताना बैल बुजाडले, शेतकऱ्याचा मृत्यू
– नांगरासह खाली पडल्याने गंभीर दुखापत; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
The गडविश्व
ता. प्र/ देसाईगंज, दि. २७ : स्वतःच्या शेतात बैलजोडीने नांगरणी करत असताना बैल अचानक बुजाडल्याने नांगरासह खाली पडून गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. चिंतामण नकटू राऊत (रा. चोप) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, चिंतामण राऊत हे काल आपल्या शेतात बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी करीत होते. यावेळी अचानक बैल बुजाडल्याने ते नांगरासह जमिनीवर कोसळले. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक स्वप्निल इजपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रियंका बावणे, पोलीस हवालदार मुरारी गेडाम आणि जयपाल बांबोडे करीत आहेत.
चिंतामण राऊत यांच्या पश्चात पत्नी, एक अविवाहित मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here