धानोरा ग्रामीण रुग्णालयात विशेष स्वच्छता मोहीम; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे श्रमदान

5

धानोरा ग्रामीण रुग्णालयात विशेष स्वच्छता मोहीम; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे श्रमदान
– जुन्या नस्त्यांचा निपटारा, भंगाराची विल्हेवाट आणि रुग्णालय परिसराची स्वच्छता
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २८ : ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता आणि प्रशासकीय कामकाजाला गती देण्याच्या उद्देशाने धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात २७ ऑक्टोबर रोजी ‘विशेष स्वच्छता मोहीम ६.०’ राबविण्यात आली. या मोहिमेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून रुग्णालय परिसराची स्वच्छता केली.
केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशासकीय सुधारणा विभागाच्या (DARPG) मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये रुग्णालयाच्या बाह्य परिसरासह बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, औषध वितरण कक्ष आणि तपासणी कक्षाची स्वच्छता करण्यात आली.

जुन्या नस्त्यांचा निपटारा, भंगाराची विल्हेवाट

मोहिमेदरम्यान वर्षानुवर्षे पडून असलेल्या जुन्या व कालबाह्य नस्त्यांची छाननी करून त्यांचा निपटारा करण्यात आला. तसेच निकामी साहित्य आणि ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून अनावश्यक जागा मोकळी करण्यात आली. रुग्णांना स्वच्छ, सुरक्षित आणि संसर्गमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. बागराज धुर्वे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. स्वच्छता हा आरोग्याचा पाया असून, अशा उपक्रमांमुळे आरोग्य संस्थांमध्ये सुटसुटीतपणा आणि पारदर्शकता वाढते. ग्रामीण भागातील रुग्णांना स्वच्छ व निर्जंतुक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. धुर्वे यांनी सांगितले.
या मोहिमेत डॉ. निशांत बांबोळे, परिचारिका सना शेख, कविता गावडे, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी महेश हंगे, गणेश कुळमेथे आणि औषध निर्माण अधिकारी रामटेके यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here