नागपूर पदवीधर निवडणुकीत काँग्रेसची बाजी; अभिजीत वंजारी ३,२७१ मतांनी विजयी

3

नागपूर पदवीधर निवडणुकीत काँग्रेसची बाजी; अभिजीत वंजारी ३,२७१ मतांनी विजयी
– भाजपच्या सुधाकर कोहळेंचा पराभव
The गडविश्व
नागपूर, दि. २९ : नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवत भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना पराभूत केले. तब्बल ४१ तासांहून अधिक काळ चाललेल्या मतमोजणीनंतर वंजारी यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची मिळून ६७ हजार २३१ मते मिळाली, तर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली. त्यामुळे वंजारी यांनी ३ हजार २७१ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

नागपूरमधील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. तब्बल ८४ टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, पहिल्या पसंतीक्रमाच्या दोन फेऱ्यांनंतरही कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक ७५ हजार ४३८ मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी आणि बाद फेऱ्या घेण्यात आल्या.

या निवडणुकीत एकूण १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी १५ हजार ३२ मते अवैध ठरली, तर १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली. द्वितीय पसंतीक्रमाच्या मतमोजणीनंतरही निर्धारित मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेऱ्यांमध्ये सर्वाधिक मते मिळविणारे अभिजीत वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासह विभागातील जिल्हाधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार २९ सप्टेंबरला अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली, तर २३ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर २७ ऑक्टोबरला सुरू झालेली मतमोजणी ४१ तासांहून अधिक काळ चालली आणि अखेर वंजारी यांच्या विजयाने या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here