नान्ही ग्रामपंचायतीत दिव्यांग निधीच्या हिशोबावरून वाद; ग्रामविकास अधिकाऱ्यांविरोधात तक्रार
– पाच लाभार्थ्यांच्या पात्रतेसह पाच वर्षांच्या निधीच्या विनियोगाची चौकशी करण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि.२९ : दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीच्या विनियोगाचा हिशोब मागितल्यानंतर माहिती देण्यास नकार दिल्याचा आरोप नान्ही ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी मंगेश रोशन टेंभुर्णे यांनी कुरखेडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, मागील पाच वर्षांतील निधीच्या वापराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नान्ही ग्रामपंचायतीत २७ ऑक्टोबर रोजी दिव्यांगांसाठी राखीव निधीच्या अनुषंगाने आयोजित विशेष सभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी पाच लाभार्थ्यांना मागील पाच वर्षांपासून अपात्र ठरविण्यात आल्याचा विषय समोर आला. या लाभार्थ्यांना कोणत्या योजनांतर्गत लाभ देण्यात आला, किती निधी मंजूर झाला आणि प्रत्यक्ष किती रक्कम वितरित करण्यात आली, याची माहिती मागण्यात आली.
मात्र, संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ‘माझ्याकडे वेळ नाही’ असे सांगून हिशोब देण्यास नकार दिल्याचा आरोप टेंभुर्णे यांनी तक्रारीत केला आहे. त्यामुळे दिव्यांगांसाठी राखीव निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, निधीच्या विनियोगात पारदर्शकता राखली जात आहे का, याची पडताळणी करण्याची मागणी होत आहे.
पात्रतेपासून निधी वितरणापर्यंत चौकशीची मागणी
संबंधित पाच लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यामागील कारणे स्पष्ट करावीत, मागील पाच वर्षांतील योजनांची माहिती आणि मंजूर व प्रत्यक्ष वितरित निधीचा तपशील उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी आणि निधीचा सविस्तर हिशोब लेखी स्वरूपात द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
या तक्रारीवर पंचायत समिती प्रशासनाकडून काय कार्यवाही केली जाते, तसेच दिव्यांगांसाठी राखीव निधीच्या वापराबाबत कोणती माहिती समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews













