गडचिरोली : जिल्हा परिषदेत अनुकंपा नियुक्तीसाठी २ नोव्हेंबरला समुपदेशन
– प्रतीक्षासूचीतील १९२ उमेदवारांना संधी; मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी सोमवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता समुपदेशन आयोजित करण्यात आले आहे. यासाठी अंतिम प्रतीक्षासूचीत समाविष्ट १९२ उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने ३१ डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण झालेल्या अनुकंपा नियुक्तीच्या प्रकरणांची तपासणी करून आवश्यक माहिती पूर्ण असलेल्या उमेदवारांची अंतिम प्रतीक्षासूची तयार केली आहे. ही सूची जिल्हा परिषदेच्या “अधिकृत संकेतस्थळावर” (https://zpgadchiroli.maharashtra.gov.in) तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रतीक्षासूचीतील गट-क संवर्गाच्या अनुक्रमांक १ ते १७६ आणि गट-ड संवर्गाच्या अनुक्रमांक १ ते १६ पर्यंतच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. या उमेदवारांचे शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदांसाठी समुपदेशन करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात पार पडणार आहे.
अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया ज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता आणि सामाजिक प्रवर्गानुसार उपलब्ध रिक्त पदांच्या आधारे पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी समुपदेशनासाठी आवश्यक मूळ कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नियुक्ती मिळवून देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे. अशा प्रकारे कोणी पैशांची मागणी केल्यास किंवा नोकरीचे आमिष दाखविल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे (९४०५२१७८७६) किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अनिकेत पाटील (९७६७५०१५३०) यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे.













